उजनी धरणावर ‘जॅकवेल’चे काम युद्धपातळीवर; 1300 एचपीचे 6 पंप उपसणार 24 तास पाणी; जलवाहिनीचे 103 किमी काम पूर्ण


सोलापूर : सोलापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसांत सुटणार आहे. सोलापूर ते उजनी या ११० किलोमीटर जलवाहिनीचे काम १०३ किमीपर्यंत पूर्ण झाले आहे. सध्या उजनी धरणावरील जॅकवेलचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्याचा पहिला स्लॅब बुधवारी (ता. १८) टाकण्यात आला. ४० कोटींचा खर्च करून जॅकवेल उभारणी सुरू असून, त्याठिकाणी १३०० अश्‍वशक्तीचे सहा पंप बसविले जातील. त्याद्वारे २४ तास पाणी उपसा करणे शक्य होणार आहे.

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, सोलापूरकरांना नियमित किंवा एक-दोन दिवसाआड तरी पाणी मिळावे, यासाठी समांतर जलवाहिनीचे काम गतीने सुरू आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या नेतृत्वात अवघ्या १५ महिन्यात १०० कि.मी. जलवाहिनी पूर्ण झाली आहे. समांतर जलवाहिनीसाठी जीएसटीसह ८९२ कोटी रुपये लागणार आहेत. त्यात २५० कोटी महापालिकेचे तर २५० कोटी रुपये ‘एनटीपीसी’चे आहेत. उर्वरित निधी हा नगरोत्थान योजनेतून मिळाला आहे.

Advertisement

पुढील ५० वर्षांचा विचार करून ही जलवाहिनी टाकली जात असून, १५ नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर नोव्हेंबरअखेर जलवाहिनीची चाचणी होईल. ते पुढे १५ दिवस सलग सुरू ठेवली जाणार आहे. त्यानंतर साधारणत: १ जानेवारीपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात बदल करून आठवड्यातून एकदा दोन दिवसाला तर एकदा तीन दिवसाला पाणी सोडले जाणार आहे. सध्या जॅकवेलचे काम सुरू असून १५ ऑक्टोबरपर्यंत ते पूर्ण होईल, असे महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले.

सोलापूरकरांचा १४ वर्षांचा वनवास संपणार

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा २०१४ पासून तीन-चार दिवसांआड तर कधी पाच दिवसांआड झाला आहे. आता समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर सोलापूरकरांना आठवड्यात तीन व दोन दिवसांतून एकदा पाणी मिळणार आहे. ‘अमृत-२’योजनेतील कामे पूर्ण झाल्यास पुन्हा एक दिवसांआड किंवा नियमित पाणी शक्य होणार आहे. त्यासाठी ‘अमृत-२’मधून निधी मिळणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी, समांतर जलवाहिनीला पाकणी ते कोंडी एमबीआरपर्यंत ६० एमएलडी जलवाहिनी जोडण्याचेही नियोजन महापालिकेकडून सुरू आहे. जेणेकरून केगाव, बाळे, भवानी पेठ अशा परिसरातीला पुरेशा दाबाने पाणी देता येणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!