“लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिक
महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे. मात्र, ऐन निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडीक यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद रंगण्याची चिन्ह आहेत. ‘लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये पैसे घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर महिलांचे फोटो काढून पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो’, असं विधान धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील एका सभेत बोलताना केला आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पारायला मिळणार आहे. सध्या विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत. या सभेच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी नेते जनतेला आवाहन करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
“जर या ठिकाणी काँग्रेस पक्षाची रॅली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या, ज्या महिला १५०० रुपये आपल्या योजनेचे घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या आणि नावं लिहून घ्या. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. अनेक ताया महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे असं म्हणतात. मग पैसे नकोत का? या पैशांचं राजकारण करता? आता काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे आणि आमच्याकडे द्यायचे, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर कोणी मोठ्याने भाषण करायला लागली तर एक फॉर्म द्यायचा आणि या फॉर्मवर सही कर म्हणायचं. नको आहेत ना पैसे. लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचं. लगेच बंद, आमच्याकडेही पैसे जास्त झाले नाहीत”, असं विधान खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे.