Solapur BJP : भाजपच्या सोलापूर शहर उपाध्यक्षांसह चौघांना नोटीस


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून राजकीय पक्षाची उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने उमेदवारी मिळावी, यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्याकडे फिल्डिंग लावून प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः पक्षाच्या उमेदवारपासून इच्छुकांपर्यंत सर्वजण तिकिटासाठी तयारी करत आहेत.

सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून (South Solapur Constituency) विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी गेली सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे, त्यांनी भाजपकडेही उमेदवारीची मागणी केली असून तसा अर्जही त्यांनी भाजपचे (BJP) सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे उमेदवारी मागणीचा अर्जही दाखल केला आहे.

माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या गोटातील भाजपचे सोलापूर शहर उपाध्यक्ष श्रीनिवास करली यांच्यासह चार माजी नगरसेवकांनी सोमनाथ वैद्य यांना दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी शिफारस पक्षाकडे केली आहे. त्यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून माजी सहकार मंत्री देशमुख गटाला धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Advertisement

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवारी मिळावी, यासाठी सोमनाथ वैद्य यांनी सोलापूरचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे आपला उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जासोबत देशमुख गटाचे श्रीनिवास करली, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, लक्ष्मी पुरुड, राजश्री पाटील आणि जुगनबाई आंबेवाले यांचे शिफारस पत्र जोडण्यात आलेले होते.

सोमनाथ वैद्य हे भाजपचे प्राथमिक सदस्यही नाहीत, तरीही शहर उपाध्यक्ष असलेले करली यांनी वैद्य यांच्या उमेदवारीसाठी शिफारस केली आहे, त्यामुळे पक्षशिस्तीचे उल्लंघन झाल्याचे सांगून याबाबत तातडीने खुलासा करण्यात यावा; अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा या चौघांना नोटीसीद्वारे देण्यात आलेला आहे.

भाजपकडून देण्यात आलेल्या नोटिशीवर सोलापूरचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची सही नाही. मात्र, सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, रोहिणी तडवळकर विशाल गायकवाड यांच्या सह्या आहेत. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजीवरही आता दबक्या आवाजात सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!