इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या महिला पोलिसाच्या मृतदेहाचा शोध सुरु


आळंदी : आळंदीतील इंद्रायणी नदीत एका महिला पोलिसाने रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. नदीत उडी मारण्यापूर्वी तिने तिच्या एका मित्राला फोन केला असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.अनुष्का सुहास केदार (वय २० वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे.आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे त्या नेमणुकीस होत्या.

Advertisement

रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली. मात्र नदीत उडी मारण्यापूर्वी अनुष्का केदार यांनी देहूफाटा आळंदी येथे राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला होता. मी इंद्रायणी नदीत उडी मारणार असल्याचे त्यांनी फोनवर म्हटले असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या मित्राला बोलावून घेत त्याची चौकशी सुरु केली आहे. रविवारी सायंकाळी आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन विभागाला पाचारण केले. अंधार पडल्याने रविवारी शोधकार्य थांबवण्यात आले. सोमवारी (दि. २६) पुन्हा आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, एनडीआरएफ यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य सुरु आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!