सोलापूर विमानतळावरून उडणार 40 अन्‌ 70 सीटर विमाने; विमानतळाचा रन-वे 2009 मीटर; नाईड लॅण्डिंग सध्या नाही


सोलापूर : ‘डीजीसीए’ (नागर विमानन महानिदेशालय) आणि ‘बिकास’ (ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) या दोन्ही यंत्रणांच्या परवानगीनंतर आता सोलापूरचे होटगी रोड विमानतळ विमानसेवेसाठी सज्ज झाले आहे. आता अंतिम मंजुरी मिळून मार्ग व विमान कंपन्या निश्चित झाल्यानंतर येथून एटीआर ही ४० व ७० सीटर विमाने उड्डाण करतील. मोठी विमाने उड्डाण करतील, एवढा रन-वे नसल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.

सोलापूरच्या होटगी रोड विमानतळासाठी प्रमुख अडथळा ठरणारी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची ९२ मीटर चिमणी १५ जूनला पाडण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यात विमानसेवा सुरू होईल, असे सांगण्यात आले. मात्र, वर्ष होऊनही विमानसेवा सुरू झाली नाही. त्यावर सातत्याने टीका झाली आणि विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या. रन-वे, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची सोय, ड्रेनेज अशी कामे तातडीने निविदा काढून पूर्ण करण्यात आली. त्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सतत पाठपुरावा केला. दोन हजार नऊ मीटर लांबीचा रन-वे असून त्यावरूनच विमान उतरणार आणि उड्डाण देखील करणार आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या १५ जून २०१६ च्या ‘उडान’ योजनेतून सोलापूरची विमानसेवा तब्बल आठ वर्षांनी सुरू होत आहे. देशातील सामान्य लोकांनाही माफक दरात विमानातून प्रवास करता यावा हा त्या योजनेचा उद्देश आहे. सोलापूरची विमानसेवा आता दोन महिन्यात सुरू होईल. तुर्तास विमान कंपन्या व पहिल्यांदा कोणते मार्ग असतील, यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून बोलणी सुरू असल्याची माहिती होटगी रोड विमानतळाचे व्यवस्थापक बानोत चाम्पला यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. सुरवातीला सोलापूर ते मुंबई, हैदराबाद, गोवा या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

नाईड लॅण्डिंग सध्या तरी नाही

होटगी रोड विमानतळावरून पहिल्या टप्प्यात दिवसा विमानसेवा सुरू होणार आहे. विमानसेवेचा प्रतिसाद, प्रवासी पाहून नाईट लॅण्डिंगची सोय केली जाणार आहे. तत्पूर्वी, विमान कंपन्या, मार्ग निश्चित होणे जरूरी असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून त्यासंदर्भात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!