मोहोळ टोळीत माणूस पेरून केला गेम
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा शुक्रवारी भरदिवसा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या खुनाचा कट महिनाभरापासून शिजत होता. विशेष म्हणजे शरद मोहोळच्या जवळचीच माणसे हा कट रचत होते. याचा शरद मोहोळला जरा सुद्धा सुगावा लागला नाही. शरद मोहोळची हत्या करण्यामागचे कारणही समोर आले आहे. दहा वर्षांपूर्वी झालेले भांडण या खुनाचे कारण ठरले आहे. या खून प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. यातील मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा वीस वर्षाचा तरुण प्रमुख मारेकरी आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी शरद मोहोळ आणि यातील काही आरोपींचे भांडण झाले होते. त्यावेळी आरोपी लहान होते. तेव्हा शरद मोहोळने त्यांना मारहाण केली होती. शरद मोहोळ आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यासाठी असल्याने त्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, चारचौघात अपमान करणे अशी कृत्य शरद मोहोळकडून वारंवार होत होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी फार पूर्वीच बदला घेण्याचे ठरवले होते.
महिनाभरापूर्वीच आरोपींनी शरद मोहोळचा खून करण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी तीन पिस्टल खरेदी केल्या. शरद मोहोळच्या संपूर्ण दिनक्रमाची आरोपींनी रेकी केली. त्याच्या येण्या जाण्याच्या वेळा, कुठे जातो कुणाला भेटतो याची इत्यंभूत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. आरोपींनी मारेकरी मुन्ना पोळेकरला आधीच शरद मोहोळच्या टोळीत घुसवले. मुन्ना पोळेकर हा सतत शरद मोहोळच्या सोबत असायचा. त्यामुळे शरद मोहोळची दिवसभरातील संपूर्ण माहिती तो आरोपींना देत होता.
त्यानंतर शुक्रवारचा दिवस उजाडला. त्यादिवशी शरद मोहोळचा खून करण्याचे आरोपींनी ठरवले. मुन्ना पोळेकर त्यादिवशीही शरद मोहोळ सोबत होताच. दुपारी एक वाजून वीस मिनिटाच्या सुमारास शरद मोहोळ सुतारदरा येथील घरातून बाहेर पडला. लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होता. हीच संधी आरोपींनी साधली. दबा धरून बसलेल्या आपल्या इतर साथीदारांना मुन्ना पोळेकर याने खबर दिली. आणि त्यानंतर घरातून बाहेर पडताच सर्वात आधी मुन्ना पोळेकर यानेच शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात शरद मोहोळ खाली कोसळला. मोहोळ सोबत असणाऱ्या इतरांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याजवळ बंदूक असल्याने ते घाबरून पळून गेले. त्यानंतर आरोपींनी दोन चार चाकी गाड्यातून पळ काढला. मात्र अवघ्या काही तासात या सर्व आरोपीच्या मुसक्या आवळल्या.