पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे’ नाव
पुणे : पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी मंत्री होताच केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी पाठपुरावा करून नवे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज केले आहे. त्याचबरोबर आता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी, राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी भूमिका पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे.यासंदर्भातील हालचालींना वेग आला असून नावासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, यासाठी मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पुण्याचं विमानतळ असलेलं लोहगाव हे जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचं आजोळ होतं. यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचं नातं जिव्हाळ्याचं होतं. शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही देखील हीच इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला संत तुकोबारायांचं नाव देणं, हे अधिक समर्पक असणार आहे असे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी, राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार केला आहे. विमानतळाचे नामकरण करताना त्याच्या नावाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो. त्यानंतर या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होईल असे हवाईमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.