धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा करून श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला. यांच्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरलं जाऊ शकतं. काडादी यांच्यासाठी सध्या भारतीय जनता पार्टीत असलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते राजशेखर शिवदारे यांनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
यासाठी काडादी यांच्या गंगा निवासस्थानी झालेल्या बैठकीला राजशेखर शिवदारे, सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन पुष्कराज काडादी, तालुकाध्यक्ष हरीश पाटील, राधाकृष्ण पाटील, गुरुसिद्ध म्हेत्रे, महादेव चाकोते यांच्या अनेक नेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर शिवदारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिष्टमंडळ टाकळी येथील सुशीलकुमार शिंदे यांच्या जाई जुई फार्म हाऊस येथे जाऊन त्या ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काडादी हे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे माहिती दिली.
यातच लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून काँग्रेसतर्फे प्रणिती शिंदे या निवडणूक लढवीत असताना भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांचा प्रचार करणारे नेतेच आता काडादी यांच्या उमेदवारीच्या शिफारशीसाठी शिंदे यांना साकडे घालत असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, भविष्यात धर्मराज काडादी यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर काँग्रेसकडून इच्छुक असलेले माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हासपुरे, 2019 चे उमेदवार बाबा मिस्त्री, एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनवरे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील या प्रमुख नेत्यांची भूमिका काय राहील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.